Pune Traffic Solution: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रह्मास्त्र’ उपसले आहे. शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी आता जमिनीवरील रखडलेल्या ट्रॅफिकऐवजी ‘पाताळलोका’चा म्हणजेच हायटेक भुयारी मार्गांचा आधार घेतला जाणार आहे. तब्बल ३४ हजार कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंतिम आराखडा आता तयार झाला असून, लवकरच पुण्याचा प्रवास जमिनीखालून वेग घेणार आहे.
काय आहे ‘पाताळलोक’ संकल्पना?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. सध्याची मेट्रो शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मार्गाने धावतेच आहे, मात्र आता खासगी वाहनांसाठीही शहराच्या पोटाखालून ५४ किलोमीटर लांबीचे पाच मोठे बोगदे तयार केले जाणार आहेत.
प्रकल्पाचे प्रमुख टप्पे आणि मार्ग:
उत्तर-दक्षिण पुणे जोडण्यासाठी पाच मुख्य भुयारी मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे:
- येरवडा (शास्त्रीनगर) ते कोंढवा (खडी मशीन चौक)
- सिंहगड रस्ता (पु. ल. देशपांडे उद्यान) ते जगताप डेअरी (औंध मार्गे)
- खडकी ते येरवडा (शास्त्रीनगर चौक)
- पु. ल. देशपांडे उद्यान ते सेव्हन लव्हज चौक (शंकरशेठ रोड)
- बाणेर ते पाषाण (डीपी रोड नुसार भुयारी मार्ग)
स्वतंत्र कंपनी (SPV) करणार अंमलबजावणी
या महाकाय प्रकल्पाचा भार पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर पडू नये, यासाठी ‘पुणे स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर एक स्वतंत्र उद्देश वहन यंत्रणा (SPV) म्हणजेच विशेष कंपनी स्थापन केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी सल्लागार कंपन्यांच्या मदतीने भूगर्भ तपासणी आणि तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.
महापालिकेचे दोन अतिरिक्त बोगदे
राज्य सरकारच्या या पाच मार्गांशिवाय पुणे महापालिका स्वतःहून आणखी दोन बोगदे उभारण्याच्या तयारीत आहे. यामध्ये पाषाण-कोथरूड आणि हिंगणे-धनकवडी या दोन महत्त्वाच्या जोडमार्गांचा समावेश असेल. यामुळे टेकड्यांमुळे फिरून जावे लागणारे अंतर आणि वेळ दोन्ही वाचणार आहे.
का गरजेचा आहे हा प्रकल्प?
पुण्याचे रस्ते प्रामुख्याने पूर्व-पश्चिम दिशेला विकसित झाले आहेत. मात्र, उत्तर-दक्षिण वाहतुकीसाठी रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत. टेकड्यांमुळे नवे रस्ते बांधण्यासाठी जमिनीची उपलब्धता नाही, त्यामुळे जमिनीखालील ‘टनेल’ हाच पुण्यासाठी भविष्यातील एकमेव पर्याय उरला आहे.


