Laxman Hake Post: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वातावरण तापले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी होत असताना, ओबीसी नेते याला तीव्र विरोध करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच पवार कुटुंबावरही टीका केली. त्यामुळे त्यांना फोनवरून धमक्या मिळाल्याची माहिती पुढे आली आहे. काही ओबीसी नेते स्वतःच त्यांना डावलत असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. या घडामोडीत हाके यांची फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
हाके यांनी फेसबुकवर लिहिलेल्या भावनिक पोस्टनंतर त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत जे घडले त्याने मी निराश झालो आहे. मात्र माझा उद्देश राजकारण करणे नाही. माझं ध्येय म्हणजे जीआर रद्द होऊन आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणे. लोकांच्या मनातून मला कोणी काढू शकणार नाही. मी ओबीसी बांधवांशी संवाद साधणार आहे आणि प्रस्थापितांविरुद्ध लढा देणार आहे. शत्रूंपासून आणि स्वकीयांपासूनही त्रास होत असला तरी मागे हटणार नाही.’ त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या पोस्टनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा फोन आला, मात्र छगन भुजबळ यांनी संपर्क साधला नाही. ते बिझी असतील.
हाके यांची फेसबुक पोस्ट
आपल्या पोस्टमध्ये हाके यांनी लिहिले की, ‘मी एक धनगर समाजातील पोरगा आहे. बॅनर, स्टेज किंवा मोठ्या सभा घेण्याची ताकद माझ्याकडे नाही. तरीही ओबीसी बांधवांनी मला साथ दिली. आंदोलन, मोर्चे, रॅलीमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलात, याबद्दल मी ऋणी आहे. मी ओबीसीच्या बाजूने लढत राहिलो, लाखो लोक जोडले, पण शत्रूंची संख्या देखील वाढली. आता सहन होत नाही. उद्या दैत्यनांदूर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार मानतो.’


