Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं यांनी म्हटले आहे. त्याबाबतची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. याबाबतची पत्रकार परिषद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यानंतर लवांडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या गैर कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी देखील याबाबत अनेक वेळा भ्रष्टाचाराचा चौकशी बाबत मागणी केली आहे.
भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरल्याने लवांडे यांना धमक्या येत असल्याचं रोहित पवार यांनी देखील सांगितले आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याकडून सातत्याने पुणे बाजार समितीत होत असलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीवर आवाज उठवला जातोय. यामुळे काही गुंडांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्याकडून सातत्याने पुणे बाजार समितीत होत असलेला भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या लुटीवर आवाज उठवला जातोय. यामुळं काही गुंडांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागला… pic.twitter.com/bZGtV8SL0R
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 1, 2025
त्यांच्या केसालाही धक्का लागला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारवर राहील. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिलं असून त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी आणि विकास लवांडे यांना संरक्षण द्यावं, अशी आमची मागणी आहे. असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान लवांडे यांनी पोलीस आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळातील काही व्यक्ती आपल्याला धमकावत असल्यास सांगितला आहे. तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही. 24 तास तुझ्या कुणी राखणीला नाही. आम्ही शांत बसणार नाही तुझी आमच्याशी गाठ आहे. तुला संपवल्याशिवाय राहणार नाही. नेते घरी राहतील तू देवा घरी जाशील. अशा धमक्या आपल्याला दिल्या जात असल्याचं लवांडे यांनी म्हटले आहे.


