केस हे महिलांसह पुरुषांचेही सौंदर्य खुलवते. त्यात दर तीनपैकी एका व्यक्तीला वयाच्या २५ व्या वर्षी आपले केस पांढरे होत असल्याची चिंता वाटते. पण तुम्हाला माहित आहे का की, अलीकडे लहान मुलांचे केसही पांढरे होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. लहान मुलांमध्ये केस पांढरे होण्याची समस्या कमी वयातच दिसून येत आहे.
जर तुमच्या मुलाचे केस नेहमीपेक्षा लवकर पांढरे होत असतील तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलांचे केस वेळेआधी पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य कारणे म्हणजे अनुवांशिकता किंवा फॅमिली हिस्ट्री. जर पालकांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना वेळेआधी केस पांढरे होण्याचा अनुभव असेल, तर मुलालाही ही समस्या येऊ शकते. पोषक तत्वांची कमतरता हे देखील केस पांढरे होण्याचे एक प्रमुख कारण आहे. विशेषतः Vitamin B12, लोह आणि प्रथिने यांच्या कमतरतेमुळे शरीरात मेलॅनिन (केसांचा रंग ठरवणारे रंगद्रव्य) अपुरे तयार होऊ शकते, ज्यामुळे केस पांढरे होतात.
थायरॉईड आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे देखील केस अकाली पांढरे होऊ शकतात. थायरॉईडच्या समस्यांमुळे चयापचय क्रिया मंदावते आणि केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अत्यधिक मानसिक ताण किंवा दबाव देखील केस पांढरे होण्यास कारणीभूत ठरू शकतो. ताणामुळे मुलांमध्ये हार्मोनल बदल होऊन केस गळू शकतात.


