Bone Glue: वैद्यकीय क्षेत्रात चीनने मोठा शोध लावला आहे. तुटलेल्या हाडांचे उपचार जलद गतीने करण्यासाठी संशोधकांनी ‘बोन-02’ नावाचा गोंद (Bone Glue) तयार केला आहे. असा दावा करण्यात येत आहे की या ग्यूमुळे फक्त काही मिनिटांतच हाडे जोडणे शक्य होईल. ग्लोबल टाईम्सनुसार, चीनच्या पूर्व झेजियांग प्रांतातील संशोधन पथकाने हा गोंद विकसित केला आहे. ऑयस्टरपासून प्रेरित या तंत्रज्ञानाचा वापर फ्रॅक्चर झालेल्या हाडांना जोडण्यासाठी केला जाईल.
प्रयोगशाळेत यशस्वी चाचणी
चाचण्यांमध्ये ‘बोन-02’ पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये ते मजबूत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यात कमाल 400 पौंड बंधन शक्ती, सुमारे 0.5 एमपीएची कातरण्याची शक्ती आणि सुमारे 10 एमपीएची संकुचित शक्ती नोंदवली गेली आहे. या आकडेवारीवरून हे गोंद पारंपरिक उपचारांपेक्षा अधिक टिकाऊ असल्याचे दिसते.
बोन-02 कसे काम करते?
झेजियांग ऑनलाइनच्या माहितीनुसार, हाडांचा गोंद एका इंजेक्शनद्वारे थेट फ्रॅक्चरवर वापरता येतो. फक्त 3 मिनिटांत तुटलेली हाडे जोडली जातात. विशेष म्हणजे हाड बरे होताच हा गोंद शरीरात नैसर्गिकरित्या विरघळतो, त्यामुळे इम्प्लांट काढण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया करण्याची गरज उरत नाही.
हा प्रकल्प चीनचे ऑर्थोपेडिक सर्जन लिन झियानफेंग यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला. 2016 मध्ये निवासी डॉक्टर असताना त्यांनी पाहिले की, अनुभवी सर्जनलाही तुटलेली हाडे नीट जोडण्यासाठी तासन्तास लागतात आणि अनेकदा परिणाम समाधानकारक नसतात. त्यातूनच त्यांना ‘बोन ग्लू’ तयार करण्याचा विचार सुचला आणि आज तो यशस्वी प्रयोग ठरला आहे.


