Sanjay Raut On NCP Alliance: नगरपालिकेनंतर आता महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असून महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन भूकंप होत आहेत. मुंबईत ठाकरे आणि मनसे यांच्या युतीची उद्या अधिकृत घोषणा होणार असतानाच, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे.
अजित पवारांवर राऊतांचा निशाणा
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘अजित पवार यांचे नेते सध्या देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी आहेत. जर पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येत असेल, तर अजित पवारांना महायुतीमध्ये राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही.’
काँग्रेस आणि मनसे एकत्र?
पुण्यातील राजकीय गणितांवर भाष्य करताना राऊत यांनी स्पष्ट केले की, जर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या गटासोबत जाणार नाही. पुण्यात शिवसेना (UBT) आणि मनसे एकत्रितपणे निवडणुका लढतील. काँग्रेसलाही सोबत घेण्यासाठी चर्चा सुरू असून, पुण्यात ‘ठाकरे-मनसे-काँग्रेस’ असे नवीन समीकरण पाहायला मिळू शकते.
मुंबईत ‘ठाकरे’ बंधूंसमोर मोठे आव्हान
मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असले तरी त्यांच्यासमोर काही महत्त्वाची आव्हाने आहेत. काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांना आपल्याकडे खेचण्याचे मोठे आव्हान ठाकरे बंधूंसमोर असेल. उत्तर भारतीय मतदार भाजपच्या बाजूने झुकण्याची शक्यता असल्याने, मराठी मतांचे विभाजन टाळून ती पूर्णपणे आपल्या पारड्यात पाडण्यासाठी ठाकरे बंधूंना मोठी रणनीती आखावी लागणार आहे. मुंबईसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी अद्याप चर्चा सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. जर चर्चा यशस्वी झाली, तर उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी आम्ही शरद पवारांनाही निमंत्रण देऊ. ते सध्या पुण्यात आहेत, पण त्यांनी यावे अशी आमची इच्छा आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.


