इंदापूर: इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी भरत सुरेशदास शहा यांनी शनिवारी (दि.15) उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे आगामी निवडणुकीत इंदापूरमध्ये राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. अलीकडील राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने शहा यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे सोमवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत.
नगरसेवक पदासाठीही अनेक उमेदवारी अर्ज दाखल
नगरसेवक पदासाठी गणेश देवकर, रोहित ढावरे आणि संतोष ढोले यांनी अर्ज दाखल केले. कृष्णा-भीमा विकास आघाडीकडून संतोष ढोले यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने शैलेश पवार आणि मयुरी उंबरे यांनीही आपापले अर्ज सादर केले.
हेही वाचा – इंदापूरमधील राजकारण तापलं! उमेदवार निवडीवरून अजित पवारांच्या पक्षात बंडाचा झेंडा
मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती
अर्ज दाखल करताना माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आजी-माजी नगरसेवक, तसेच भरत (शेठ) शहा यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
इंदापूरचा विकास माझा ध्यास – भरत शहा
दरम्यान, यावेळी भरत शहा म्हणाले, ‘इंदापूरचा विकास, स्वच्छ प्रशासन आणि सर्वसामान्यांचा सन्मान हा माझा एकमेव ध्यास आहे. लोकांचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे.’


