जळगाव: शहरातील ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्म येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर प्रकरणाने जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थक ललित कोल्हे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ८ जणांना अटक करण्यात आली आहे. ललित कोल्हे यांना ९ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन दिवसांत ६७ विदेशी नागरिकांना कॉल
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी पोलिसांनी एल.के. फार्मवर छापा टाकला. या कारवाईत ३१ लॅपटॉप जप्त करण्यात आले. पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ दोन दिवसांत ६७ विदेशी नागरिकांना फसवणूक करणारे कॉल करण्यात आले होते. अंदाजे १२ दिवसांत हे प्रमाण ६५० पेक्षा जास्त असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना दररोज कॉल डेटा डिलिट करण्याचे आदेश देण्यात येत असल्याचेही तपासात उघड झाले.
अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह परदेशी नागरिकांना बनावट कॉल
हे कॉल सेंटर अमेरिका, कॅनडा, इंग्लंडसह इतर देशांतील नागरिकांना लक्ष्य करत होते. बनावट कंपनी एजंट असल्याचे भासवून ऑनलाइन फसवणूक आणि पैसे ट्रान्सफर करून घेतले जात होते. रात्रीच्या वेळीच हे ऑपरेशन सुरू असायचे, जेणेकरून परदेशातील नागरिकांशी सहज संपर्क साधता येईल.
तीन प्रमुख सूत्रधार फरार, लूकआउट नोटीस जारी
या घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधार म्हणून ऋषी बेरिया, अकबर खान आणि आदिल सय्यद यांची नावे समोर आली आहेत. हे तिघे सध्या फरार असून, ते देशाबाहेर पलायन करू नयेत म्हणून लूकआउट नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
हेही वाचा – Pune Crime : पुण्यात काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना अटक; नेमकं प्रकरण काय?
तपासावर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप
या प्रकरणात दोन मंत्र्यांनी पोलिसांना फोन केल्याचा आरोपही पुढे आला आहे. एका मंत्र्याने कोल्हेंना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची विनंती केल्याचे, तर दुसऱ्याने कठोर कारवाईसाठी दबाव आणल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर तपासावर राजकीय दबावाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, एसपी महेश्वर रेड्डी यांनी तपास पूर्णपणे निष्पक्ष आहे असे स्पष्ट केले आहे. परदेशातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याने हे प्रकरण आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे (ED किंवा CBI) सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


