Pune IT Park Scam: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. फेक कंपन्यांच्या नावाखाली मोठ्या संख्येने गुंतवणूकदार उभे केले त्यांच्याकडून करोडोंची रक्कम उकळली. टी डब्ल्यू डे नावाच्या कंपन्यांच्या जाळ्यात अडकून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकांसह एकूण 23 जणांविरोधात वारजे-माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण घोटाळ्याचा सूत्रधार समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या दाम्पत्यासोबत अनेक कंपन्यांचे डायरेक्टर व मॅनेजर या फसवणुकीत सहभागी आहेत. प्रार्थना प्रथमेश मशीलकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
नेमका घोटाळा काय?
फसवणूक करणाऱ्या आरोपींनी सुरुवातीला ‘लर्निंग सोल्युशन्स’ नावाच्या क्लासमार्फत शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांना त्यांच्या नेटवर्कमध्ये सामील केले. त्यानंतर टी डब्ल्यू डे इव्हेंट्स आणि इतर काही बनावट कंपन्यांकडून आकर्षक गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले. यामध्ये, 10 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 3 टक्के मासिक परतावा, 10 लाखांवर 4 टक्के, तर 25 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर 5 टक्के मासिक परतावा देण्याचे आश्वासन दिले गेले.
सुरुवातीच्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा मिळाल्याने त्यांचा कंपनीवर विश्वास बसला. यामुळे अनेकांनी बँका आणि इतर ठिकाणांहून कर्ज काढून मोठी रक्कम गुंतवली. फिर्यादी प्रार्थना मशीलकर यांनीही कर्ज घेऊन तब्बल 32 लाख रुपये गुंतवले होते. मार्च 2025 पर्यंत त्यांना वेळोवेळी गुंतवणुकीचा परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर अचानक सर्वांचे पेमेंट बंद झाले. आयकर विभागाची प्रक्रिया सुरू आहे किंवा परदेशी गुंतवणूक येणार आहे, अशी कारणं देत कंपनीने वेळ मारून नेली.
दहा कंपन्यांच्या नावे पैसे गोळा
नार्वेकर दाम्पत्याने टी डब्ल्यू डे इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, लर्निंग सोल्युशन्स, आयटी सोल्युशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, मीडिया अशा दहाहून अधिक वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून पैसे गुंतवून घेतले. या सर्व कंपन्यांचे नियंत्रण नार्वेकर दाम्पत्याकडेच होते. काही गुंतवणूकदारांनी 10 लाख, काहींनी 25 ते 50 लाख, तर एका गुंतवणूकदाराने तब्बल 2.83 कोटी रुपये गुंतवले होते. बहुतांश गुंतवणूकदारांनी कर्ज घेऊन ही गुंतवणूक केल्यामुळे, आता कर्जाचे हप्ते फेडणे त्यांना अशक्य झाले आहे. अनेक गुंतवणूकदारांवर बँकांनी वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे.


