Laxman Hake: मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईमध्ये शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत OBC नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ, विखे पाटील असे मोठे नेते हजर होते. मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली. मात्र, सध्या ओबीसी आंदोलनासाठी चर्चेत असलेले लक्ष्मण हाके यांना या बैठकीत बोलावलं नसल्याने त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली. या दरम्यान, त्यांनी जेजुरीमधून आंदोलनाची हाक देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्याने ओबीसी नेत्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे ते येत्या 10 ऑक्टॉबरला होणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चावर ठाम आहेत. एकीकडे या बैठकीत ओबीसी नेत्यांचं समाधान झालं नसल्यामुळे ते नाराज आहेत.
तर दुसरीकडे या बैठकीला आमंत्रण न दिल्यामुळे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके नाराज आहेत. त्यामुळे आता नाराज हाकेंनी आता जेजुरीमधून आंदोलनाची हाक देण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा मेळावा जेजुरीत येथे होणार आहे.
यासाठी ओबीसी समाज बांधवांना एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलण्याचं आवाहान केलं आहे. त्यामुळे आता हाकेंच्या आवाहनाला ओबीसी समाज किती प्रतिसाद देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मराठा समाजाच्या आंदोलानाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला आहे.
जातीवादी लोकांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. तर जीआर रद्द करण्याच्या मागणीवर ओबीसी नेते छगन भुजबळ ठाम आहेत. त्यामुळे आता फडणवीस सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे दोन्ही समाजातील लोकांचं लक्ष लागलं आहे.


