CJP X Account Banned: इंटरनेटवर अल्पावधीत धुमाकूळ घालणाऱ्या आणि तुफान लोकप्रिय झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल मोहिमेला मोठा झटका बसला आहे. या मोहिमेचे अधिकृत ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंट भारतात अचानक ब्लॉक (प्रतिबंधित) करण्यात आल्याने सोशल मीडिया विश्वात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अवघ्या काही दिवसांत लाखो नेटीझन्सना आकर्षित करणाऱ्या या पेजवर नेमकी कोणत्या कारणास्तव कारवाई करण्यात आली, याचे अधिकृत कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
वादाच्या एका ठिणगीतून झाला होता जन्म
देशातील बेरोजगार तरुणांच्या संदर्भात एका नेत्याने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. या विधानाचा उपरोधिक आणि उपहासात्मक (Sarcastic) पद्धतीने निषेध करण्यासाठी काही तरुणांनी एकत्र येत ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाचा डिजिटल ट्रेंड सुरू केला. सुरुवातीला एक सामान्य मीम किंवा चेष्टा वाटणारी ही मोहीम पाहता-पाहता राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा मुख्य विषय बनली.
इन्स्टाग्रामवर बड्या राजकीय पक्षांना टाकले मागे!
बेरोजगारीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या या मोहिमेला देशातील तरुणांनी डोक्यावर घेतले. या मोहिमेच्या इन्स्टाग्राम पेजने अल्पावधीतच थेट कोट्यवधी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला. इंटरनेट जगतात अशी चर्चा रंगली होती की, या पेजने लोकप्रियतेच्या बाबतीत देशातील आघाडीच्या राजकीय पक्षांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सनाही मागे टाकले होते.
काय म्हणाले मोहिमेचे संस्थापक अभिजित दिपके?
या डिजिटल मोहिमेचे प्रणेते अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी एक व्हिडिओ जारी करत या संपूर्ण प्रकारावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, “गेल्या काही तासांपासून अकाऊंट हॅक किंवा त्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यानंतर अचानक हे ‘X’ अकाऊंट भारतात दिसणे बंद झाले आहे.” सध्या भारतीय युजर्सना हे अकाऊंट अॅक्सेस करता येत नसल्याची पुष्टी त्यांनी केली.


