Leopard Attack: गेल्या काही दिवसांपासून राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा दुर्दैवी घटनांमुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला गमावलेल्या घरांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत आहे. या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन आता एका महत्त्वाच्या प्रस्तावावर गंभीरपणे विचार करत आहे. हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना वन विभागात सरकारी नोकरी देण्याच्या प्रस्वावर चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे. वन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी जीवितहानीचा वाढता आलेख लक्षात घेऊन राज्य सरकार यावर लवकरचं निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ओतूर येथे बिबट्याचा थरार! शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या तत्परतेने बचाव
आर्थिक दिलासा देण्यासाठी नोकरीचा प्रस्ताव
कुटुंबातील आधारस्तंभ गमावल्यामुळे संबंधित कुटुंबांवर डोंगराएवढा आर्थिक भार येतो. मुलांचे शिक्षण, घराचा खर्च, शेती आणि कर्जाची जबाबदारी पेलणे त्यांना कठीण होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या दिली जाणारी आर्थिक मदत दीर्घकाळ पुरेशी नसते. त्याऐवजी, सरकारी नोकरी हा त्या कुटुंबाला कायमस्वरूपी आणि मोठा दिलासा देणारा उपाय ठरू शकतो. यामुळे आर्थिक वाताहत थांबेल आणि कुटुंबाला पुन्हा उभे राहण्यास मदत मिळेल. शासनाकडून लवकरच या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – Leopard Attack: अंधारात फोनवर बोलणं पडलं महागात! नारायणगावमध्ये 18 वर्षांच्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे स्थानिक नागरिक धास्तावले –
राज्याच्या विविध भागांत बिबट्या आणि वाघांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रेनाखळी परिसरात बिबट्याने दोन जनावरांना ठार केलं. वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या आढळल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि जनावरे घरामध्ये बांधण्याचे आवाहन केले आहे. तथापी, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल आणि कोंडायबारी भागात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे.


