Vinod Kulkarni: साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संमेलन स्थळीच अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे शाहू स्टेडियम परिसरात एकच खळबळ उडाली असून, साहित्यप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी संमेलनाची शानदार सुरुवात झाली. मात्र, संमेलन स्थळावर कामाचे नियोजन सुरू असतानाच कुलकर्णी यांच्यावर हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही, परंतु या हल्ल्यामागचा सूत्रधार कोण आणि त्याचा हेतू काय होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दिमाखदार सुरुवात
या संमेलनाचे ध्वजारोहण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते संमेलनाचे प्रतीक हवेत सोडून या अक्षरसोहळ्याचा श्रीगणेशा करण्यात आला.
या साहित्य संमेलनात 150 पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. भव्य ग्रंथदिंडीमध्ये तब्बल 52 चित्ररथांचा सहभाग होता, ज्याने सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. कवी कट्टा, गझल कट्टा आणि प्रकाशन मंचाच्या माध्यमातून नवनवीन साहित्य प्रकारांना वाव दिला जात आहे. तथापी, संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुल पर्यावरणपूरक थीमवर सुशोभित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यिक आणि वाचक प्रेमी मोठ्या संख्येने साताऱ्यात दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.


