Indapur: विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि ‘SkillEcted’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘डेटा अॅनालिस्ट’ विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. २९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत ही पाच दिवसीय कार्यशाळा पार पडली. यामध्ये एकूण ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, महाविद्यालय आणि ‘SkillEcted’ कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे (MoU) विद्यार्थ्यांकडून या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही. ही कार्यशाळा २ दिवस ऑफलाईन आणि ३ दिवस ऑनलाईन अशा संमिश्र (Hybrid) स्वरूपात घेण्यात आली. यामध्ये आफरीन सलीम शेख आणि निकिता गुंड यांनी प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॉम्प्युटर विभागाचे प्रमुख प्रा. प्रफुल्ल कांबळे उपस्थित होते.
डेटा सायन्सचे महत्त्व
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सदानंद भुसे यांनी आजच्या काळात डेटा सायन्सचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. प्रशिक्षक आफरीन शेख यांनी डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमधील रोजगाराच्या संधी व या क्षेत्राची भविष्यातील व्याप्ती यावर सविस्तर तांत्रिक माहिती दिली. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. कोमल कलेल आणि प्रा. अर्चना बिचकुले यांनी स्टाफ को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले.
व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. डेटा ॲनालिसिससारखी क्षेत्रे भविष्यात रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार असून अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरतात. महाविद्यालय अशा प्रशिक्षणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी सक्षम बनवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी नमूद केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. योगेश जाधव यांनी उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी अशा प्रशिक्षणांची गरज व्यक्त केली. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणामुळे डेटा ॲनालिसिस क्षेत्रातील आपला आत्मविश्वास वाढल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.


