NSS Cleanliness Drive: इंदापूर तालुक्यातील कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) वतीने नुकतीच एक दिवसीय ‘स्वच्छता मोहीम’ उत्साहात राबविण्यात आली. संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पूर्ण झाला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळिग आणि डॉ. प्रशांत शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ एक उपक्रम नसून ती आयुष्यभराची शिदोरी आहे. वर्गातील चार भिंतींच्या बाहेर जाऊन मिळणाऱ्या शिक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक प्रभावी माध्यम आहे.
हेही वाचा – सायकलपटू हरीश डोंबाळे याच्या यशामुळे इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकत्रित येऊन काम केल्याने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते आणि त्यांच्यातील नेतृत्व गुण वाढीस लागतात. देशाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभाग घेऊन महाविद्यालय परिसर चकाचक केला. या प्रसंगी डॉ. संदीप पवार, प्रा. धुळदेव वाघमोडे, समिती सदस्य डॉ. अमर वाघमोडे, प्रा. रवी गायकवाड, प्रा. सोमनाथ चव्हाण, प्रा. महादेव माळवे आणि प्रा. आकांक्षा मेटकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. सुवर्णा बनसोडे यांनी मानले.


