नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अंतर्गत धुसफूस आता महायुतीमध्ये उघडपणे दिसू लागली आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने या वादाची ठिणगी चांगलीच भडकली. या राजकीय गदारोळानंतर दोनच दिवसांनी, एकनाथ शिंदे आज तात्काळ दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून, सूत्रांनुसार, या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील समन्वय आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर, शिंदेंसह शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केली होती. या भेटीत नाराजी दूर करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात असतानाच, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
शिंदे दिल्लीला जाताच फडणवीस-अजित पवारांची तातडीची बैठक
एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये वाढलेली नाराजी आणि खुद्द मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, या पार्श्वभूमीवर महायुतीतील बिघडलेला समन्वय कसा सुधारायचा यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. नाराजी वाढत गेल्यास भविष्यातील राजकीय परिस्थिती कशी हाताळायची, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये गांभीर्याने विचारविनिमय झाल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या ‘ऑल इज वेल’ नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


