Gadchiroli Accident News : गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील तळोधी गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. स्कॉर्पिओ आणि ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न सोहळा आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली आहे. मृतांमध्ये दोन जणांचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे.
रामपूर येथून लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासाकडे जात होते. या वाहनात एकूण 16 प्रवासी प्रवास करत होते. गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील तळोधी गावाजवळ असलेल्या एका धोकादायक वळणावर, समोरून येणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सने स्कॉर्पिओला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, स्कॉर्पिओ वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. लग्नाच्या आनंदाचे रूपांतर काही क्षणांतच आक्रोशात झाले.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असताना दोघांचा प्राण वाटेतच गेला. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.


