India LPG Supply Update: इराणमधील युद्धविरामानंतर देशात एलपीजी, पीएनजी तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्र सरकारनं मोठा खुलासा करत दिलासा दिला आहे. सरकारकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
गॅस पुरवठा सुरळीत, टंचाईचा प्रश्न नाही
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा (Sujata Sharma) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशात दररोज सुमारे 1 लाख एलपीजी सिलेंडरची विक्री होत असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे.
मंत्रालयाने स्पष्ट केले की, एलपीजी वितरक आणि पेट्रोल पंपांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. घरगुती एलपीजी पुरवठा सामान्य असून 98 टक्के बुकिंग ऑनलाइन पद्धतीने होत आहेत.
व्यावसायिक गॅस पुरवठाही मार्गावर
व्यावसायिक एलपीजी पुरवठा देखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या सुमारे 70 टक्के पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे. 14 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 1 लाख 6 हजार टन एलपीजीची विक्री झाली असून दररोज 6 ते 6.5 हजार टन विक्री होत असल्याची माहिती देण्यात आली.
लहान सिलेंडरचा पुरवठा वाढवला
5 किलोच्या एलपीजी सिलेंडरबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सुलभता मिळावी म्हणून ओळखपत्राशिवायही या सिलेंडरचा पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे. दररोज सुमारे 1 लाख 5 किलो सिलेंडर विकले जात असून 23 मार्चपासून आतापर्यंत 11 लाख सिलेंडरची विक्री झाली आहे.
पीएनजीकडे वळण्यावर भर
सरकारकडून एलपीजीऐवजी पीएनजी वापर वाढवण्यावरही भर दिला जात आहे. यासाठी देशभरात 2400 हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नैसर्गिक वायू पुरवठ्यातही सुधारणा होत असून उद्योग क्षेत्राला सुमारे 80 टक्के आणि खत उद्योगाला 95 टक्के पुरवठा पुन्हा सुरू झाल्याचे मंत्रालयाने सांगितले.
युद्धविरामाचा सकारात्मक परिणाम
इराणमधील युद्धविरामानंतर जागतिक ऊर्जा पुरवठ्यावरचा दबाव कमी झाला आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही दिसून येत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


