Pune Water Supply: पावसाळा उशीरा सुरु झाल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची तयारी महापालिकेने सुरु केली आहे. महापालिकेला मंजूर असलेला पाण्याचा साठा अधिकाधिक काळ टिकावा. त्यासाठी पुणे शहरात आगामी काळात आठवडयातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवाला तर १० टक्के पाणी कपात होणार आहे. शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास २५ टक्के पाणी कपात होणार आहे. त्यामुळे आठवडयातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करावा असा प्रस्ताव पुणे महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग आयुक्त नवल किशोर राम यांच्यापुढे ठेवणार आहे. त्यानंतर पाणी कपातीवर निर्णय घेण्यात येणार आहे.
शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज १६५० दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यानुसार महिन्याला १.८३ टीएमसी पाणी दर महिन्याला उचलले जाते. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आता महापालिकेला ०.२७५ टीएमसीची पाणीकपात करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाच्या मान्सूनवर ‘अल-निनो’ व ‘आयओडी’चा प्रभाव असल्याने एकूण पाऊसमान कमी असेल, असा इशारा दिला आहे. त्यानुसार खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी महापालिकेला याबाबत महिन्याच्या उचलण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात १५ टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. कितीही नोटीस आल्या तरी पुणेकरांचा एक थेंब देखील कमी होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली आहे. या सर्व पाश्वभुमीवर महापालिकेने १५ टक्के पाणीकपात करावी, अशी नोटीस महापालिकेला आल्याचे महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख जगताप यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाण्याचा साठा काही प्रमाणात अधिक आहे. मात्र पावसाळा उशीरा सुरु होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने त्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून केले जात आहे.
तीन महिन्यात १२ दिवसाचे पाणी बचत होईल
महापालिकेने आठवड्यात एक दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवल्यास महिन्याला चार दिवसांचे पाणी वाचेल. पुढील तीन महिन्यांमध्ये १२ दिवसांचे पाणी वाचेल. यामध्ये १० टक्के पाण्याची बचत होईल. तर दिवसाआड पाणी दिल्यास २५ टक्के पाण्याची बचत होईल. त्यामुळे हे दोन्ही प्रस्ताव तयार करुन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठविला जाणार आहेत. त्यामध्ये काय अडचणी येऊ शकतात. याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे, असे पालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
पाणीकपातीचे नियोजन सुरु करण्यात आले असून आठवडयातुन एक दिवस पाणी पुरवठा बंद किंवा दिवसाआड पाणी पुरवठा करावा हे दोन प्रस्ताव तयार करुन ते आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे पाठविले जाणार आहेत. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेतील लोकप्रतिनिधींसमोर वस्तूस्थिती मांडून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा अंतिम निर्णय होईल . – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका


