सिंधुदुर्ग : तळकोकणासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केले आहे. “आता ठरवलंय घरीच बसायचं,” असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दोन्ही मुलं राजकारणात स्थिरावली असून आता त्यांनाच पुढील जबाबदारी सांभाळू द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकांमध्ये राणे कुटुंबाला संमिश्र यश मिळाले. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेतील विसंवादाचा फटका बसल्याचेही चित्र दिसून आले. विशेष म्हणजे या निवडणूक प्रचारापासून नारायण राणे दूर राहिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
दरम्यान, “माझं राजकारण संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप आमदार निलेश राणे यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर आज (ता. ४) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह विरोधकांना इशारा देण्यासाठी राणे समर्थकांनी जोरदार रॅली काढत नारायण राणेंचा जाहीर सत्कार केला.
या सत्कार सभेत बोलताना नारायण राणे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करत, “राणेंना संपवणं सोपं नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. राजकारणातील कट-कारस्थानांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, सतत काम करत राहणं शक्य नसतं. वय वाढतं, शरीर थकतं आणि कधी तरी थांबावंच लागतं, याच भावनेतून आपण घरी बसण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी निलेश आणि नितेश राणे यांच्यावर विश्वास व्यक्त करत, “कोकणाच्या विकासाचं राजकारण आता ही दोघं पुढे नेतील,” असे सांगितले. कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी, “फक्त हाक दिल्यावर ‘ओ’ द्या,” असे आवाहनही केले.
महायुतीतील नेते आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना नारायण राणे म्हणाले, “एकत्र रहा, पैशासाठी राजकारण करू नका. द्वेषाचं राजकारण टाळा. मला बोलायला कोणाचीही भीती नाही.” तसेच, “या जिल्ह्यात माझ्याआधी आणि माझ्यानंतर माझ्यासारखं काम कुणी केलं असेल तर दाखवा,” असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
या वक्तव्यांमुळे नारायण राणे लवकरच सक्रिय राजकारणातून बाजूला होतील का, याबाबत चर्चा रंगली असून त्यांच्या संभाव्य निवृत्तीच्या चर्चांना जोर आला आहे.


