बोईसरः बोईसर पूर्व भागातील अनधिकृत दगड वाहतूक प्रकरणात तलाठी हितेश राऊत यांच्यावर हल्ला करणारा आरोपी धीरज सुधीर भंडारी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. घटनेला दहा दिवस उलटले तरीही आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि कारवाईच्या गतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
तलाठी राऊत यांनी शुक्रवारी मौजे गुंदले सजा भागात अनधिकृत दगड वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त केले. या कारवाईदरम्यान धीरज भंडारी याने तलाठ्याला धक्काबुक्की करत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत ट्रक ताब्यात घेतले, मात्र हल्लेखोर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलिसांनी साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू ठेवला आहे.
मात्र दहा दिवस उलटूनही कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. स्थानिक नागरिकांकडून या विलंबावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिस तपासाची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्थानिकांनी पोलिसांच्या या गतीने होणाऱ्या तपासावर ताशेरे ओढत हल्लेखोराला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असल्याचा आरोप केला आहे.


