बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राजकारण चांगलेच तापले जात असून, देशमुख यांच्या निघृण हत्येमागे मुंडे यांचे कार्यकर्तेच असून, त्यांनी बीड जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. यासोबतच माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही सुरुवातीपासून मुंडेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी सातत्याने राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
तसेच आता मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे नेतेही मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही असून, तशी मागणी उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे मंत्री मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे आमदार हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत.


