नवीन पनवेल: गाडीत लिफ्ट देऊन प्रवाशाला मारहाण करून लुबाडणाऱ्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. असदुल्ला उस्मान मिरकर (२८ रा. माणगाव) आणि जुबेर मुजावर (२५, रा दापोली) अशी या दोघांची नावे आहेत. प्रशांत पाटील हे पनवेल बस डेपो बाहेर उभे असताना तेथे एक कार आली. त्यातील असदुल्ला मिरकर व जुबेर मुजावर यांनी प्रशांत यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर कार नेक्सॉन मॅरेथॉन बिल्डिंग, पळस्पे येथे आली असता त्यांनी प्रशांत यांचा मोबाईल काढून घेतला. त्यांच्या बँक खात्यातून गुगल पेवरून ६ हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे काढून घेऊन त्यांना मारहाण करून तेथेच सोडून पसार झाले.
याबाबतची तक्रार प्रशांत यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पो.नि. नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपींचा शोध घेत त्यांच्यापैकी एकाला चिपळूण परिसरातून, तर दुसऱ्याला माणगाव परिसातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून या घटनेतील सारा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


