नाशिक : शिवसेना ठाकरे गटातू बाहेर पडलेले उपनेते सुनील बागूल, तसेच महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्या भाजपा प्रवेशाला अखेर पुढील आठवड्यात मुहूर्त लाभला आहे. नाशिकमध्येच हा प्रवेश सोहळा करण्याचे नियोजन असून, त्यास प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार असल्याचे समजते.
मनपाचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्यासह अनेकांनी गत महिन्यात भाजपात प्रवेश केला. त्याचवेळी बागूल व राजवाडे यांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र, एका प्रकरणात दोघांवरही गुन्हे दाखल झाल्याने भाजपाकडून त्यांचा प्रवेश सोहळा थांबविण्यात आला. या प्रवेश सोहळ्याच्या दिवशीच उबाठाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर भाजपाने बागुल व राजवाडे यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. या उभयतांविरुद्धची तक्रार संबंधित व्यक्तीने मागे घेतल्यामुळे प्रकरण आता शांत झाल्यात जमा आहे.
पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर बागूलांचा प्रवेश सोहळा पुढील आठवड्यात निश्चित करण्यात आला असून, तारीख व ठिकाण बाकी राहिले आहे. बागूल यांच्यासह राजवाडे, शंभू उर्फ मनीष बागूल, अजय बागूल, बाळा पाठक, गुलाव भोये, तसेच काही माजी नगरसेवकही प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले.
भाजपात प्रवेश 6 पुढील आठवड्यात होऊ शकतो. त्यानुसार नियोजन सुरू आहे. प्रवेश सोहळा नाशिकला व्हावा, या दृष्टीने तयारी केली जात आहे. प्रवेश सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-सुनील बागूल, माजी उपनेते, ठाकरे गट


