Bihar Election Results 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजारी अवस्थेतूनही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. डॉक्टरांनी त्यांना दोन महिन्यांचा कडक विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी नियमित घेतली जाणारी सकाळची पत्रकार परिषदही बंद ठेवली आहे. सार्वजनिक कार्यक्रम आणि कॅमेऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला पाळत असून, दोन महिन्यांनंतर पूर्णपणे बरा होऊन पुन्हा सक्रिय होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बिहारमधील मतमोजणीचा वेग वाढत असताना संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “या निकालांनी कुणीही आश्चर्यचकित होऊ नये. निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यातील समन्वय पाहता यापेक्षा वेगळ्या निकालाची अपेक्षा करणं चुकीचं ठरलं असतं. अगदी महाराष्ट्रातील निकालांसारखं चित्र पुन्हा पाहायला मिळालं. बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नचं राबवण्यात आला आहे. ज्यांची सत्ता येण्याची शक्यता होती, त्यांना 50 च्याही आत रोखून धरण्यात आलं,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला वेग, पहिला कल समोर; NDA की महागठबंधन, कोण आघाडीवर?
महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुकीतही असंच चित्र दिसलं होतं. महायुतीनं एकतर्फी विजय मिळवत बहुमत मिळवलं होतं, तर महाविकास आघाडी फक्त 46 जागांवर थांबली. बिहारमध्येही त्याच धर्तीवर निकाल लागत असल्याची स्थिती आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपप्रणीत एनडीए सुमारे 195 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडीकडे केवळ 38 जागांचा आकडा आहे. भाजप 90 ठिकाणी पुढे आहे, जेडीयू 81 जागांवर आघाडीवर आहे. एलजेपी 20 आणि एचएएम 4 जागांवर पुढे आहे. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला 28, काँग्रेसला 5 आणि डाव्यांना 4 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे.


