मुंबई: बिहार निवडणुकीच्या निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. निकाल लागण्याच्या दिवशी झालेली ही अनपेक्षित भेट राजकीय असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात ही भेट वेगळ्याच कारणासाठी असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
बिहारमधील कलांनुसार एनडीएला सत्ता मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाची एकत्रित संख्या बहुमताच्या जवळ पोहोचत असल्याने नितीश कुमार यांच्यावर अवलंबित्व कमी होणार असल्याचेही राजकीय सूत्रांचे मत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध ठिकाणी नव्या राजकीय आघाड्या आणि चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत जवळीक वाढत असल्याची चिन्हे दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव पाठवला होता, अशी माहिती अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यानंतर दोन्ही गट राज्याच्या पातळीवरही एकत्र येणार का, यावर चर्चा सुरू झाली.
हेही वाचा – बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला वेग, पहिला कल समोर; NDA की महागठबंधन, कोण आघाडीवर?
अशातच सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र नंतर हे स्पष्ट झाले की त्या आपल्या भाचा, राष्ट्रवादी युवानेते युगेंद्र पवार यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लग्नपत्रिका देऊन विवाहसोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे दोन्ही बाजूंनी मौन बाळगले असले, तरी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.


