Delhi Blast Update: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या विनाशकारी कार स्फोटानंतर दहशतवादी उमर मोहम्मदविरुद्ध सुरक्षा यंत्रणांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. दहशतवादविरोधी दलाने केलेल्या विशेष कारवाईत उमर मोहम्मदचे घर आयईडीच्या नियंत्रित स्फोटाने पाडण्यात आले, आणि या ऑपरेशनची अचूकता इतकी नेमकी होती की आसपासच्या कुठल्याही घराला धक्का बसला नाही.
दिल्ली स्फोटात 11 नोव्हेंबरच्या कार स्फोटात आतापर्यंत १२ जणांचे मृत्यू झाले असून, २० पेक्षा जास्त नागरिक जखमी आहेत. या भीषण घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षेचा इशारा दिला आहे. घटनेचा तपास अनेक सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांकडून एकत्रितपणे सुरू असून, स्फोटाशी संबंधित चार संशयास्पद वाहने जप्त करण्यात आली आहेत. तपासात उघड होत असलेल्या नवीन माहितीमुळे कटाचा विस्तार आणखी स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा! डॉक्टरांनी ‘या’ अॅपद्वारे रचला भयानक कट
दरम्यान, फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाशी या कटातील दहशतवाद्यांचे संबंध असल्याचे दिसून आल्यानंतर विद्यापीठाचे सदस्यत्व गुरुवारी रद्द करण्यात आले. या विद्यापीठाच्या पार्किंग परिसरातून जप्त झालेली एक संशयास्पद कार डॉ. शाहीन शाहिद यांच्या नावावर नोंदली आहे. त्यांना दहशतवादी कट रचल्याच्या आरोपावरून अटक झाली असून, तपास यंत्रणा त्या वाहनाचा आणि विद्यापीठाचा गुन्ह्यातील संबंध तपासत आहेत.
उमर मोहम्मदच्या घराचा स्फोट करून केलेली कारवाई ही या संपूर्ण दहशतवादी रॅकेटला उध्वस्त करण्याच्या दिशेने सुरक्षा यंत्रणांची महत्त्वाची पायरी मानली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


