Maharashtra Heatwave: राज्यात उन्हाचा कडाका आता असह्य होऊ लागला असून हवामान विभागाने पुढील ७२ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता असून, पुणे हवामान विभागाने अनेक भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा विक्रमी पातळी गाठण्याची चिन्हे आहेत.
पारा ४६ अंशांच्या पार जाण्याची भीती
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेच्या लाटेसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव ओसरल्याने उत्तरेकडून येणाऱ्या तप्त वाऱ्यांमुळे तापमानात ४ ते ६ अंशांची वाढ होऊ शकते. यामुळे अकोला, अमरावती आणि चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
पुढील ५ दिवस पावसाची विश्रांती
नागरिकांना उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, येत्या ५ दिवसात पावसाची कोणतीही शक्यता नाही. परिणामी, लख्ख सूर्यप्रकाश आणि कोरड्या हवामानामुळे उष्माघाताचा (Sunstroke) धोका वाढला आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात ही उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे.
विदर्भातील प्रमुख शहरांमधील सद्य तापमान (अंश सेल्सिअसमध्ये):
- अकोला: 44.9
- अमरावती: 44.6
- वर्धा: 43.2
- बुलढाणा: 42.6
- नागपूर / ब्रम्हपुरी: 42.2
- चंद्रपूर: 42.0
- गडचिरोली: 41.2
- गोंदिया: 40.4
आरोग्य विभागाचे आवाहन: ‘ही’ काळजी घ्या
वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत:
- दुपारी बाहेर पडणे टाळा: सकाळी 12 ते दुपारी 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका.
- जलसंजीवन: सतत पाणी प्या, लिंबू पाणी, ताक किंवा ओआरएस (ORS) चा वापर करा.
- पोशाख: हलक्या रंगाचे आणि सुती कपडे वापरा. बाहेर जाताना डोके झाकून ठेवा.
- आहार: तेलकट पदार्थांऐवजी हलका आणि पचायला सोपा आहार घ्या.


