Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात थंडीने जोरदार हजेरी लावली असून, पुणे, धुळे, जळगावसह अनेक शहरांमध्ये तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. विशेष बाब म्हणजे, पुण्यातील हवेली परिसरात किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअसवर घसरले असून, ते महाबळेश्वरच्या १९.६ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे. राज्यातील सर्वात नीचांकी तापमान धुळे येथे ८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यापाठोपाठ जेऊरमध्ये १०, जळगावमध्ये १०.५ आणि परभणीत १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान कायम राहील आणि किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडीचा जोर वाढणार आहे. पुणे शहरात गेल्या तीन-चार दिवसांत तापमानात लक्षणीय घट झाली असून, काल रविवारी १४.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर आज ते १६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास होते. पुढील तीन-चार दिवसांत आणखी घट होण्याची शक्यता आहे, आणि हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले आहे.
अमरावतीतही तापमानात कमालीची घट होऊन पारा १८ अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत असून, सकाळी हुडहुडी भरवणारी गारठा नागरिकांना त्रास देत आहे. थंडीपासून बचावासाठी लोक शेकोटीचा आधार घेत आहेत. एकत्र बसून शरीराला उब मिळवण्यासाठी शेकोटी पेटवली जात आहे. घराबाहेर पडताना उबदार कपडे घालणे अनिवार्य झाले असून, सकाळी चहावर ताव मारत नागरिक थंडीचा सामना करत आहेत.


