Crime News : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका ६ वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी (७ नोव्हेंबर) संध्याकाळी घडली. पीडित बालिका खासगी शिकवणी वर्गातून घरी परतत होती. वाटेत आरोपीने तिला गाठून अत्याचार केला. या प्रकरणी मुखेड पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून, त्याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. सध्या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. पीडित बालिकेवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर आहे.
देगलूरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी सांगितले की, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. खासदार रवींद्र चव्हाण यांनीही खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, बालसुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


