Beed Crime News : बीड जिल्ह्यात गुंडगिरी आणि मारहाणीच्या घटनांना काही केल्या ब्रेक लागत नाही. याच साखळीतील आणखी एक थरारक प्रकरण समोर आले आहे. शिरूर तालुक्यातील रायमोह येथील अपंग व मतिमंद विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विशेष शाळेच्या गेटबाहेरच पाच-सहा अल्पवयीन टोळक्याने एका विद्यार्थ्याला घेरून बेदम मारहाण केली. पीडित विद्यार्थी गुरासारखा रडत-हंबरडा फोडत होता, तरीही मारेकऱ्यांनी त्याला सोडले नाही. हा संपूर्ण प्रकार दोन दिवसांपूर्वीचा असून त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
व्हिडीओत दिसते की, शाळेच्या मुख्य गेटबाहेरच हे सहा-सात मुले एका विद्यार्थ्याला एकत्र घेरतात आणि त्याला लाथ मारणे, बुटाने तुडवणे, थप्पड-लाथ मारणे सुरू ठेवतात. पीडित विद्यार्थी मदतीसाठी ओरडत असतो, पण आजूबाजूला कोणीही मदतीला धावून येत नाही. मारहाणीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही आणि या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.
ही घटना उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पालकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष शाळेतील मुलांना अशा प्रकारे टार्गेट केले जाणे अत्यंत गंभीर असल्याचे मत पालक व्यक्त करत आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून साखळीने मारहाण, खंडणी, हत्येच्या घटना घडत असून कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. या नव्या प्रकरणाने पुन्हा एकदा पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हायरल व्हिडीओनंतर पोलिस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


