Ajit Pawar News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राजकीय पक्षांनी तयारीला जोर धरला आहे. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने भाजप आणि शिवसेनेच्या आधीच आपला पहिला उमेदवार जाहीर करून एक पाऊल पुढे टाकले आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषदेसाठी माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी स्वतः या उमेदवारीची घोषणा केली.
या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबर रोजी पार पडेल. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर अजित पवार गट पहिल्यांदाच नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये उतरतो आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर स्थानिक स्तरावरही अजित पवारांनी जोरदार तयारी केली आहे.
पारनेरमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक मोठा राजकीय उलटफेर झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. झावरे कुटुंबीयांचा या भागात मजबूत प्रभाव असून, दिवंगत वसंतराव झावरे हे पारनेरचे माजी आमदार राहिलेले आहेत.


