बीड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुती आणि महाआघाडीतील नेते कंबर कसून प्रचारात उतरले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात धुसफूस वाढत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्टार प्रचारक म्हणून आमदार धनंजय मुंडे यांना आपल्या मतदारसंघात पाठवू नये, असा थेट निरोप पक्ष नेतृत्वाला दिला आहे. यामागे युती न झाल्याबाबतचा रोष आणि वैयक्तिक द्वंद्व कारणीभूत असल्याचे सोळंके यांनी स्पष्ट केले आहे.
प्रकाश सोळंके यांनी सांगितले, “धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात स्टार प्रचारक म्हणून पाठवू नका. ते इथे येऊन नेमका कोणता स्टारपणा दाखवणार? त्यांचे काम परळीतच राहावे. माजलगावात आले तर विपरीत परिणाम होईल.” ही वक्तव्ये सोळंके यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना केली असून, यामुळे पक्षांतर्गत तणाव वाढला आहे.
युती न झाल्याबाबत खंत
सोळंके यांनी युतीबाबतही उपरोधिक टिप्पणी केली. “परळीत मुंडे बहीण-भावांची युती होते, मग बीडमध्ये का होत नाही? युती होऊ नये म्हणूनच काहींनी प्रयत्न केले. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी युतीसाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. उलट युती टाळण्यासाठी जास्त मेहनत झाली,” असा आरोप त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणे अवघड असते, पण बीडमध्ये फक्त परळीतच युती होते, इतर ठिकाणी प्रयत्न होत नाहीत, ही खंत सोळंके यांनी व्यक्त केली. या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
मागील वाद आणि पार्श्वभूमी
ही धुसफूस नवीन नाही. माजलगाव आणि धारूर नगरपालिका निवडणुकांसाठी युतीची अपेक्षा होती, पण ती झाली नाही. यापूर्वीही सोळंके यांनी मुंडे यांच्यावर फार्म हाऊसवर बैठका होत असल्याचा आरोप केला होता. तसेच, संतोष देशमुख हत्याकांडासारख्या प्रकरणांमध्ये मराठवाड्यातील अजित गटाच्या आमदारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यात सोळंके यांचाही समावेश होता. नुकतेच बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांचा सोळंके गटात प्रवेश झाल्याने मुंडे कुटुंबीयांना धक्का बसला असून, हे द्वंद्व आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


