जळगाव : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा ट्रेंड वाढत असताना, जामनेर नगरपालिकेत मात्र दडपशाही आणि धमक्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असली तरी, यामागे जबरदस्तीची माघार आणि भीतीचा वातावरण असल्याचे आरोप आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते दिलीप खोडपे यांनी महाजन यांच्यावर थेट दडपशाहीचा आरोप करत आव्हान दिले आहे, तर भाजपकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
नगरपालिका निवडणुकीत माघारीचा शेवटचा दिवस असलेल्या २२ नोव्हेंबरला जामनेर शहरात राजकीय हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. २६ जागांपैकी नऊ जागांवर माघारी घेण्यात आल्या, यात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या उमेदवारांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी नऊ अर्जांपैकी आठ वैध ठरले होते, पण इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली. याशिवाय सहा नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत.
महिला उमेदवारांना धमक्या, घर सोडले
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गरीब आणि महिला उमेदवारांवर दबाव आणला. प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार जावेद मुल्ला यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, भाजप नेत्यांनी धमक्या देऊन माघार घेण्यास भाग पाडले.
या दहशतीपासून बचावासाठी जावेद मुल्ला यांनी अंजुम इरफान शहा, खाबीयाबी गुलाब खान, परविनबी शेख नाझीम आणि बतुलबी हुसेन कुरेशी या चार महिला उमेदवारांना घेऊन रात्रभर वाहनात प्रवास केला. “भीतीने आम्हाला घर सोडावे लागले, कुटुंबियांवर दडपण आणले गेले,” असा दावा त्यांनी केला आहे. एका महिलेचा अर्ज बाद करण्यात आल्याचेही सांगितले जाते. माघारीनंतर एका उमेदवाराला रडू कोसळले असल्याचे व्हिडिओही वायरल झाले आहेत.
राष्ट्रवादी नेते दिलीप खोडपे यांनी मंत्री महाजन यांच्यावर थेट हल्ला चढवला. “महाजन शहराचा विकास केला असा दावा करतात, तर निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा. दबाव तंत्र आणि दादागिरीने माघारी घेण्यास भाग पाडले, ही लोकशाहीची हत्या आहे,” असे ते म्हणाले. महायुती सरकारच्या भीतीमुळे हे प्रकार घडले असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसकडूनही पोलिस यंत्रणेच्या दुरुपयोगाचा आरोप झाला असून, “डायनॅस्टिक पॉलिटिक्सचा ट्रेंड आता स्थानिक पातळीवरही पोहोचला,” असे मत व्यक्त केले गेले.
मंत्री गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळले
मंत्री गिरीश महाजन यांनी आरोप फेटाळत सांगितले, “लोकांनी स्वतःहून माघार घेतली आहे. एकाही उमेदवाराने जबरदस्तीची तक्रार केलेली नाही. हे पक्षाच्या मजबुरीचे लक्षण आहे.” भाजपने १०० हून अधिक नगरसेवक बिनविरोध जिंकल्याचा दावा करत, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे श्रेय दिले. मात्र, विरोधकांनी याला “लोकशाहीचा खून” म्हणून चित्रित केले आहे.


