बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच हे प्रकरण वाल्मिक कराड याच्या आदेशानंतर हे प्रकरण वाढत गेले. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख जर आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असे वाल्मिक कराडने सांगितले होते, अशी कबुली घुलेनी दिली आहे. घुलेसह इतर आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी देखील हत्येची कबुली दिली आहे. यामुळे वाल्मीक कराड आणि संपूर्ण गँग अडकली आहे.
या सर्व घडामोडीनंतर आता संतोष देशमुख प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. संपूर्ण कराड गँगचा एका ऑफिस बॉयमुळे टप्प्यात कार्यक्रम झाला आहे. या हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीच्या ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. ऑफिस बॉयच्या जबाबातून हत्येचे कारण आणि वादाची ठिणगी कुठे पडली, याचा घटनाक्रम सविस्तर समोर आला आहे.
ऑफिस बॉयने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्पाच्या समोर मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांकडून गोंधळ घालण्यात आला होता. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनला आरोपींनी मारहाण केली. या दरम्यान घुले याने “मी वाल्मीक कराडचा माणूस आहे, जर कंपनी सुरू ठेवायची असेल, तर दोन कोटी रुपये खंडणी द्या.. नाहीतर कंपनी बंद करा, अशी धमकी दिली होती. तसेच घुलेच्या इतर साथीदारांनीसुद्धा दमदाटी केली होती.
सदर वाद सुरू असतानाच तिथे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले. देशमुख यांनी सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदारांना कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली होती. मात्र, त्यावेळी घुले याने सरपंच देशमुख यांना धमकी दिली. यावेळी सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही, असंही घुले म्हणाला होता. ऑफिस बॉयचा हाच जबाब वाल्मीक कराड गँगला अडकवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. बुधवारी (दि. २६) पार पडलेल्या सुनावणीत देखील या जवाबाचा उल्लेख करण्यात आला.a


