Beed crime news : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध शस्त्रांचा मुद्दा देशपातळीवर चर्चेत आला. या हत्येचे मुख्य संशयित वाल्मिक कराडकडेही शस्त्र परवाना असल्याचे समोर आले. त्यानंतर हवेत गोळ्या झाडणाऱ्या, पिस्तूल हातात घेऊन स्टायलिश रिल्स व व्हिडिओ काढणाऱ्या गावगुंडांच्या कारवाया उघड झाल्या. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर बीड पोलिस आणि महसूल विभागाने कंबर कसली. जानेवारी २०२५ मध्ये जिल्ह्यात एकूण १,२८१ शस्त्र परवाने होते. वर्षभरात तब्बल ३६५ परवाने रद्द करण्यात आले. यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ९६ जणांचा समावेश आहे. त्याशिवाय १०० मृत व ७० वयोवृद्ध व्यक्तींचे परवानेही रद्द झाले. स्वतःहून ४९ जणांनी परवाने जमा केले.
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी गृह विभागाकडून गुन्हेगारांची यादी महसूल विभागाला दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि सध्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी कठोर कारवाई करत हे परवाने रद्द केले. सध्या जिल्ह्यात फक्त ९१६ शस्त्र परवाने शिल्लक आहेत. वर्षभरात नव्याने केवळ चारच शस्त्र परवाने जारी झाले असून त्यातील तीन परवाने बँकांच्या रोकड वाहतूक सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे बीडमधील वाळू-रेती माफिया, गुंड आणि हवेत गोळ्या झाडणाऱ्या “रिल्स स्टार”ना मोठा दणका बसला आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी पोलिस-प्रशासनाची ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.


