बीड : बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे. पाटोदा तालुक्यातील दगडवाडी येथे आज पहाटे मेंढपाळ तरुण दीपक केरा बिल्ला याची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना अवघ्या तीन दिवसांतील दुसरी हत्या असून, बीडमधील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाने पोलिसांवर दबाव वाढला आहे.
पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडवाडी गावात पहाटेच्या सुमारास दीपक केरा बिल्ला (मूळचा मध्यप्रदेशचा रहिवासी) याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. दीपक हा उदरनिर्वाहासाठी काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वास्तव्यास होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे, परंतु हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी तपासाला गती दिली असून, आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तीन दिवसांत दुसरी हत्या
ही घटना ताजी असतानाच, दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील स्वराज्य नगर परिसरात विजय काळे या 25 वर्षीय तरुणाची मित्र अभिषेक गायकवाड याने किरकोळ वादातून चाकूने भोसकून हत्या केली होती. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली होती. मात्र, दीपक बिल्ला याच्या हत्येने पुन्हा एकदा जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांत बीडमध्ये खून, मारामारी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या पाच वर्षांत 308 हत्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
बीडमध्ये गुन्हेगारीचे वाढते प्रमाण
बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची जमावाने हत्या केली होती. तसेच, अंबाजोगाई येथे प्रेमप्रकरणातून राजकुमार करडे या तरुणाची कोयत्याने हत्या झाली होती. या सातत्यपूर्ण गुन्हेगारीमुळे बीडला ‘महाराष्ट्रातील बिहार’ अशी उपमा दिली जात आहे.
बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांनी पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कमी दोषसिद्धी दर आणि गुन्हेगारांवरील अपुरा अंकुश यामुळे पोलिसांवरील दबाव वाढला आहे. दीपक बिल्ला हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असला, तरी हत्येचे कारण आणि आरोपींचा शोध लागणे बाकी आहे. याशिवाय, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळेही जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तणावपूर्ण बनले आहे.


