Phaltan Female Doctor Case : साताऱ्यातील फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने मानसिक छळ आणि बलात्काराच्या आरोपांनंतर आत्महत्या केली, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिस उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलावर तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात एका सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचे नावही समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
दिवाळीच्या सणासाठी घरी येण्याची तयारी करणाऱ्या या डॉक्टरच्या निधनाच्या वृत्ताने तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक येथे रात्री उशिरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान तिच्या आई-वडिलांचा आणि भावाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावले. शेतीत कष्ट करून मुलीला डॉक्टर बनवणाऱ्या कुटुंबाचे स्वप्न चुराडले गेले.
या महिला डॉक्टरवर पोलिस उपनिरीक्षकाने चुकीच्या अहवालासाठी दबाव टाकला, याला तिने विरोध केला. यानंतर तिला पोलिस आणि घरमालकाच्या मुलाने शारीरिक आणि मानसिक छळ केला, तसेच बलात्कार केल्याचा देखील आरोप आहे. तिने हातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये याचा उल्लेख केला आहे. या घटनेने रक्षकच भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. फलटण पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याचे कनेक्शन असल्याचा आरोप होत आहे.


