Chhatrapati Sambhajinagar: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज प्रशासकीय नियोजनाचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. भाजप नेते अतुल सावे यांचे वडील आणि शिवसेनेचे माजी खासदार स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचे २०१५ मध्ये निधन झाले असूनही, २०२६ च्या निवडणुकीत त्यांचे नाव मतदार यादीत कायम असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दहा वर्षे उलटूनही नाव कमी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने, निवडणूक आयोगाच्या ‘अद्ययावत’ याद्यांच्या दाव्यांवर आणि यादी शुद्धीकरण मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘दहा वर्षांनंतरही नाव यादीत असणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे,’ अशी भावना सावे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
ईव्हीएम बिघाड आणि तांत्रिक समस्यांचा फटका
केवळ मतदार याद्याच नव्हे, तर मतदान यंत्रांच्या (EVM) तांत्रिक बिघाडामुळेही मतदारांची मोठी फरफट झाली. संभाजीनगरमधील ‘गुजराती कन्या विद्यालय’ केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू होताच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे तब्बल एक तास मतदान थांबले होते. यामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा लागून केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. अशाच प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे आणि सोलापूरसह अनेक शहरांमध्ये पाहायला मिळाल्या, जिथे मतदान यंत्रांची बटणे काम करत नसल्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला.
‘डिजिटल इंडिया’चे दावे आणि प्रत्यक्ष वास्तव
एकीकडे ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘हायटेक’ निवडणुकीच्या गप्पा मारल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र अनेक मतदारांची नावेच यादीतून गायब असल्याचे चित्र राज्यभरात पाहायला मिळाले. २०१५ मध्ये निधन झालेल्या व्यक्तीचे नाव २०२६ पर्यंत यादीतून न हटणे ही निवडणूक आयोगासाठी मोठी नाचक्की मानली जात आहे. तांत्रिक बिघाड, नावांची अदलाबदल आणि गायब झालेली नावे यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांचा उत्साह मावळत असल्याची टीका आता सर्व स्तरांतून होत आहे.


