Manoj Jarange Patil Death Threat: मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन छेडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी तातडीची कारवाई करत बीड जिल्ह्यातील दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
जालना पोलिसांचा जलद सर्च ऑपरेशन
मनोज जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी या संदर्भात जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बीड शहरात रात्री उशिरा धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली. ताब्यात घेतलेल्यांची नावे दादा गरुड अमोल खुणे (जरांगे पाटलांचे माजी सहकारी) अशी आहेत. पोलिसांच्या चौकशीत एका प्रभावशाली राजकीय नेत्याने हत्येचा कट रचल्याचा आरोप उघड झाला आहे.
हत्येचा कट कसा रचला गेला?
दरम्यान, पोलीस तपासात असे समोर आले आहे की, बीडमध्ये काही गुप्त बैठकांमध्ये जरांगे पाटलांना संपवण्याची योजना आखण्यात आली होती. या बैठकींना जरांगे पाटलांच्या एका माजी सहकाऱ्यासह इतर व्यक्ती उपस्थित होते. 2.5 कोटींच्या सुपारीची डील याच बैठकीत निश्चित करण्यात आल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग कोण? मनोज जरांगे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा
जरांगे पाटलांनी घेतली पोलिसांची भेट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील स्वतः रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांना भेटले. त्यांनी पोलिसांना सखोल तपास आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. सध्या पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून, या कटामागील प्रमुख सूत्रधार कोण, हे शोधण्याचे प्रयत्न करत आहेत.
राज्यभरात खळबळ
मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या जरांगे पाटलांच्या हत्येचा कट उघड झाल्याने राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे हा कट कोणत्या राजकीय हेतूने रचला गेला आणि आणखी कोण यामध्ये सहभागी आहेत, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर जरांगे पाटलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


