Marathwada earthquake update : महाराष्ट्रातील मराठवाडा परिसरात शनिवारी सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे घरं आणि पत्रे हलू लागली, तर अनेकांच्या स्वयंपाकघरातील मांडणीवरील भांडी खाली पडली.
भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर धावले. महिला, पुरुष आणि लहान मुले रस्त्यावर जमा झाली होती, तर काही जण सुरक्षित ठिकाणाच्या शोधात धावताना दिसले.
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. सकाळी सुमारे ८:४६ वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. परभणी, हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात या भूकंपाचा प्रभाव जाणवला. विशेषतः हिंगोली शहर, वसमत आणि कळमनुरी परिसरात नागरिक अधिक भयभीत झाले होते.
काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर आणि चंदीगड परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्या घटनेनंतर आता मराठवाड्यातही भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
दरम्यान, या भूकंपामुळे कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच नुकसानाचे नेमके आकडे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे होता, याबाबतही अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे.
प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


