Manoj Jarange Patil : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी जरांगे यांचे समर्थक संबंधित व्यक्तीला जाब विचारण्यासाठी भेंडेगावात दाखल झाले, ज्यामुळे दोन गटांमध्ये तुंबळ बाचाबाची झाली. याची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवून गावात शांतता प्रस्थापित केली.
जरांगे यांच्याविरोधात अपशब्द वापरून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करत मोठ्या संख्येने जरांगे समर्थक कुरुंदा पोलीस ठाण्यात जमले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात भेट देऊन दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या तीन व्यक्तींविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी एका तक्रारीवर कारवाई सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथे झालेल्या ओबीसी मोर्चात एका व्यक्तीने जरांगे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यामुळे महागाव, आंबा आणि इतर गावांतील तरुण भेंडेगावात जाब विचारण्यासाठी गेले होते. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता, कोणतीही तोडफोड किंवा मारहाण झाल्याचे आढळले नाही. दोन्ही समाजातील नेत्यांना वाद टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सध्या गावात आणि पोलीस ठाणे परिसरात शांतता आहे. व्हिडीओच्या सत्यतेची चौकशी करून कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही निरदोडे यांनी केले आहे.


