बीड | गोड उसामागची कडू वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील रहिवासी आणि सोशल मीडियावर रील्समुळे परिचित असलेले ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा धाराशिव जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या प्रांगणात झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
साखर कारखान्यात उसाने भरलेली ट्रॉली रिकामी होण्याच्या प्रतीक्षेत असताना अचानक ट्रॉली कोसळून गणेश डोंगरे यांच्या अंगावर पडली. विशेष म्हणजे याच वेळी त्यांची पत्नी अश्विनी डोंगरे अपघातस्थळी फेसबुक लाईव्ह करत होती. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.
अत्यंत सामान्य ऊसतोड कुटुंबातून आलेले गणेश डोंगरे आपल्या मेहनतीच्या जोरावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रील्सच्या माध्यमातून ते सोशल मीडियावरही ओळख निर्माण करत होते. मात्र, ऊसतोड कामातील जीवघेण्या जोखमीने त्यांचा अकाली बळी घेतला.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “गोड उसाची आणखी एक कडू आणि दुःखद कहाणी” अशा शब्दांत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ऊसतोड कामगारांच्या अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचं त्यांनी नमूद केलं.
धनंजय मुंडे यांनी शासनाकडे ठोस मागणी करत सांगितलं की, ऊसतोड कामगारांच्या आर्थिक संरक्षणासाठी आणि अपघात विम्यासाठी सामाजिक न्याय मंत्री असताना प्रस्तावित केलेल्या योजना तातडीने कार्यान्वित कराव्यात. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून डोंगरे कुटुंबाचे पुनर्वसन व आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे लेखी मागणी करण्यात येणार आहे.
“कठोर परिस्थितीतही स्वाभिमानाने ऊसतोडणी करून कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या गणेशच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी असून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असेही मुंडे यांनी म्हटलं आहे.


