पुणे : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये संयुक्त आघाडी करण्यात आली आहे. मात्र या आघाडीला पुण्यात मोठा धक्का बसला असून, शरद पवार गटाच्या पाच उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पुण्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे.
संयुक्त आघाडीमध्ये जागावाटप आणि उमेदवारांच्या माघारीबाबत चर्चा झाली असतानाही, ऐनवेळी दोन्ही पक्षांकडून काही प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. परिणामी काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींचे उमेदवार समोरासमोर आले. वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर बहुतांश ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली, मात्र काहींनी पक्षाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केले.
नवी पेठ–पर्वती (प्रभाग क्रमांक 27) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनराज जाधव, दीपाली बारवकर, अक्षता लांडगे आणि अशोक हरणावळ यांना घड्याळ चिन्हावर अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिलीप अरुंदेकर, अक्षदा गदादे आणि अनिकेत ऊर्फ राकेश क्षीरसागर यांनी उमेदवारी दाखल केली. पक्षाने माघार घेण्याचे आदेश दिले असतानाही त्यांनी ते झुगारून लावले.
याचप्रमाणे हडपसर गाव–सातववाडी (प्रभाग क्रमांक 16) येथेही दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आले. या ठिकाणी शरद पवार गटाच्या भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांनाही माघार घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनीही पक्षाच्या आदेशांचे पालन केले नाही.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलीप अरुंदेकर, अक्षदा गदादे, अनिकेत क्षीरसागर, भाग्यश्री जाधव आणि अविनाश काळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. तसेच संयुक्त आघाडीच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.


