Pune News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले आहेत. या निवडणुकांमुळे दोन्ही पक्षांतील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.
पुण्यातील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवाभाऊ, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दर्शवला आणि अजित पवारांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार सत्तेत असताना नेमका कोणता विकास झाला, असा थेट सवाल त्यांनी केला.
पाटील म्हणाले की, पुणे मेट्रो आणि उड्डाणपूल हे प्रकल्प भाजपच्या काळात पूर्णत्वास गेले. “महापालिका निवडणुकीत आम्ही पुन्हा विजय मिळवू आणि १५ तारखेला पुण्यात भाजपचा महापौर होईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजित पवारांकडून विकासावर टीका होत असल्याचा उल्लेख करत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. “अजित दादा म्हणतात की पुणे आणि पिंपरीत विकास झाला नाही. पण याआधी सत्ता तुमच्याकडेच होती, मग तेव्हा विकास का केला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“अजित पवार अनेक वर्ष सत्तेत होते, तरीही आज आम्हाला पाच वर्षांत काय केलं, असा सवाल विचारतात. आम्ही केलेल्या कामांची यादी मोठी आहे. जनता खुळी नाही,” असे सांगत त्यांनी मेट्रो प्रकल्पावरही टीका केली. “२००१ ते २०१७ या काळात पुण्यात मेट्रो का झाली नाही? मेट्रो आम्ही आणली, तुमची फक्त कागदावरच राहिली. आता जनता तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही काय केलं?” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.


