गंगापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासुरगाव येथे शनिवारी (११ ऑक्टोबर) दुपारी पोहण्यासाठी बंद पडलेल्या खदानीत उतरलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयूर किशोर मोईन (१५) आणि साहिल संतोष झाल्टे (१५) हे दोघेही महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये नववीच्या विद्यार्थी होते. पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून, साहिल हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या आईचा हंबरडा हृदयद्रावक होता.
मयूर आणि साहिल हे वैजापूर तालुक्यातील भगूर येथील रहिवासी होते. ते रोज शाळेसाठी भगूर ते महालगाव असे येत-जात. शनिवारी पेपर दिल्यानंतर दुपारी १ वाजता ते गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारातील गट क्र. २०४ मधील उषा कुंजबिहारी अग्रवाल यांच्या शेतातील बंद खदानीत पोहण्यासाठी उतरले.
तेव्हा अचानक पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मयूरच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण आणि आजी-आजोबा असा परिवार आहे, तर साहिलच्या पश्चात फक्त आई-वडील आहेत. साहिलचा मूळचा येवला तालुका असून, गेल्या दहा वर्षांपासून भगूर येथे मोलमजुरी करत होते. दहा वर्षांपूर्वी साहिलची दीड वर्षांची बहीण जळून मृत्यू पावली होती, त्यामुळे तो कुटुंबाचा एकमेव आधार होता.
दुपारनंतर स्थानिक नागरिकांना खदानीच्या कडेला मुलांचे दप्तर, चपला आणि कपडे पडलेले दिसले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिस पाटलांना कळवले. पोलिस पाटलांनी शिल्लेगाव पोलिसांना सूचित केले. पोलिस आणि स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू झाली, मात्र सुरुवातीला दोघे सापडले नाहीत. अखेर सायंकाळी छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.


