बीड : बीड जिल्हा कारागृहातील अधीक्षक पेट्रस जोसेफ गायकवाड यांच्यावर धर्मांतराच्या गंभीर आरोपांना नवे वळण मिळाले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी कारागृहात धर्मांतर होत असल्याचा आणि महापुरुषांच्या फोटोंऐवजी बायबल श्लोक लिहिले गेल्याचा दावा केला होता. यानंतर कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी मानसिक-शारीरिक छळाचे आरोप केले.
आता जामिनावर बाहेर पडलेल्या कैदी कल्याण भावले आणि जळगावच्या ज्योती जगताप यांनी गायकवाड यांच्यावर थेट मारहाण आणि पैशाचे आमिष दाखवण्याचे आरोप केले आहेत. यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.
कल्याण भावले यांनी सांगितले की, गायकवाड यांनी कारागृहात रुजू झाल्यापासून भजन, आरती आणि नमाज पठण बंद केले. कैद्यांवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जातो आणि नकार देणाऱ्यांना मारहाण केली जाते. भावले हे खुनाच्या गुन्ह्यात अटक होते आणि जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी हे आरोप केले. तसेच, पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.
ज्योती जगताप यांचे गंभीर आरोप
जळगावच्या ज्योती जगताप यांनी बीडला येऊन गायकवाड यांच्यावर थेट खुनाचा आरोप केला. २०२० मध्ये जळगाव कारागृहात गायकवाड यांनी ज्योतींच्या पती रवींद्र जगताप यांना धर्मांतरासाठी दबाव टाकला आणि मारहाण केली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात गायकवाड यांच्यासह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. ज्योती यांनी सांगितले की, गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांना ४० लाखांची ऑफर देण्यात आली होती. हे आरोप ऐकून पोलिस आणि प्रशासन सतर्क झाले आहे.
पडळकर यांच्या आरोपांनंतर चौकशी सुरू
आमदार पडळकर यांनी ७ ऑक्टोबरला हे आरोप केले होते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना गायकवाड यांची तात्काळ निलंबनाची मागणी केली. डीआयजी (कारागृह) नितीन वायचाळ यांनी सविस्तर चौकशीची घोषणा केली आहे. गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, तपासाच्या निकालानुसार पुढील कारवाई होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


