बीड: बीड जिल्ह्यातून ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. काटवटवाडी गावात केवळ सात महिन्यांच्या आरोही आनंद खोड या चिमुरडीच्या घशात चॉकलेट अडकून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात खेळत असताना जमिनीवर पडलेले चॉकलेट तिने तोंडात टाकले. मात्र ते घशात अडकल्यामुळे तिला श्वास घेता येईनासा झाला.
दरम्यान, नातेवाईकांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण उपचार सुरू होण्याआधीच तिने प्राण सोडले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत मुलांशी संबंधित अशा घटना वारंवार समोर येत आहेत.
नुकतेच मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलाच्या फुफ्फुसात अडकलेला एलईडी बल्ब डॉक्टरांनी यशस्वीरित्या काढला. त्या मुलाला गेल्या तीन महिन्यांपासून सतत खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक औषधोपचारांनंतरही आराम न मिळाल्याने तपासण्या करण्यात आल्या.
तथापी, सीटी स्कॅनमध्ये त्याच्या डाव्या फुफ्फुसातील ब्रोन्कसमध्ये धातूचा बल्ब अडकलेला असल्याचे स्पष्ट झाले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेनंतर अखेर त्याचा जीव वाचवण्यात यश आले. या दोन घटनांनी पालकांना मुलांच्या निष्काळजीपणामुळेही गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव करून दिली आहे.


