IND vs PAK Asia Cup: आशिया कप 2025 या स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबर पासून झाली असून, सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान ग्रुप-ए सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्याबाबत अनेक चर्चांनंतर काही पक्षांनी सामना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले गेले होते की, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानसोबत सामना खेळणे राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या आणि शहीदांच्या सन्मानाविरुद्ध आहे. याचिकाकर्त्यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2025 लागू करण्याची मागणीही केली होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेची तात्काळ सुनावणी करण्याची मागणी फेटाळून लावली आणि स्पष्ट केले, यात घाई करण्याची गरज काय आहे? हा फक्त सामना आहे. सामना नियोजित वेळेनुसार होऊ द्या. कोर्टाने यापुढे या प्रकरणी हस्तक्षेप न करण्याचा निर्देश दिला आहे.
सध्या भारतीय संघाने आशिया कप 2025 मध्ये ग्रुप-ए मध्ये स्थान मिळवले आहे. 10 सप्टेंबर रोजी सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने दुबई मैदानावर यूएईविरुद्ध पहिला सामना खेळला आणि 9 विकेट्स ने विजय मिळवला. या सामन्यात यूएई फक्त 57 धावांवर बाद झाला आणि भारताने 4.3 षटकांत लक्ष्य गाठले.
विजयानंतर भारतीय संघाचा नेट रन रेट 10.483 आहे. या विजयानंतर आता भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. सामना नियोजित वेळेनुसार पार पडणार असल्यामुळे आशिया कपच्या रसिकांसाठी उत्साहाचे वातावरण आहे.


