बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ३५ वर्षीय तरुणाच्या छातीला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की अज्ञात व्यक्तींनी त्याची हत्या केली, याबाबत पोलिस तपास करत आहेत. अंभोरा पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली असून, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
मयूर उर्फ बाळा रामदास चव्हाण (३५, रा. वाघलूज) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री अंभोरा-हिवरा रस्त्यावरील कच्च्या रस्त्याजवळ घडली आहे. रस्त्यातून जाणाऱ्या नागरिकांना मयूरचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. नागरिकांनी तात्काळ अंभोरा पोलिसांना सूचना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मयूरच्या छातीवर गोळी लागण्याची जखम आढळली, तसेच मृतदेहाजवळ विनापरवाना पिस्तूल आणि एक दुचाकी सापडली.
मयूर हा मिस्त्री काम करत होता. त्याच्याजवळ अवैध पिस्तूल कसे आले, ही मोठी शंकास्पद बाब आहे. आतापर्यंतच्या तपासात आत्महत्या की हत्येचा पुरावा मिळालेला नाही. पोलिस अधिक तपास करत असून, या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ऐन सणासुदीत घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


